कोल्हापूर सकाळच्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या वास्तू पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला लेख दैनिक सकाळच्या सहकार्याने येथे प्रसिद्ध करत आहे.
___________________________________________________
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, असे आपल्याला तसे चूकीचे शिकवले जाते. अन्न
मूलभूत गरज आहे. ते प्रत्येकजन पोट भरेपर्यंतच खाऊ शकतो. मात्र वस्त्र आणि निवारा या
आवश्यक, पूरक गरजा आहेत. त्या सापेक्ष असतात.
ही सापेक्षता किमान पासून सुरू होऊन कितीही वाढत जाते. त्यावर
बंधन नाही. तुम्ही कितीही कपडे घेऊ शकता, कितीही मोठे घर घेऊ शकता, फक्त त्यासाठी पैशांची
गरज असते. यातील स्वत:चा निवारा असावा, असे प्रत्येकाचे
स्वप्न असते. प्रत्येकाला मोठे, प्रशस्त घर हवे असते. घरापुढे बाग असावी. गाडी
लावण्यासाठी निवारा हवा. प्रत्येकाची दुचाकी लावायला जागा हवी. फुलझाडे,
लावण्यासाठी जागा हवीच. बहुतेकांचे हे घराचे स्वप्न साकार होते. मात्र ते
स्वप्नातील असते असे नाही. अपवादात्मक अतिश्रीमंतानी ३००० खोल्यांची घरे बांधल्याचेही
आपण पहातो. मात्र बदलत्या वातावरणात स्वप्नातील
घराची संकल्पना बदलण्याची गरज भासू लागली आहे.
जागतिक तापमान वाढीचे परिणाम आता स्पष्ट दिसू लागले आहेत. अचानक पाऊस येतो. ढगांचा कडकडाट, विजांचा चमचमाट, काही तासात महिन्याभरात पडणारा पाऊस पडतो आणि मुंबईची तुंबई करतो. मुंबईचे न्युयॉर्क, मॉस्को झाले नाही, मात्र यावर्षीच्या पावसाळ्यात मॉस्को आणि न्यूयॉर्कमध्ये मात्र मुंबईप्रमाणे रस्त्यांचे नद्यात रूपांतर झाले. रस्त्यावर गाड्या पोहत वाहू लागल्या. अनेक घरे पडली. जगातील बहुतांश देशात पूराची परिस्थिती उद्भवली. भविष्यात अशी परिस्थिती वारंवार येणार असल्याचे पर्यावरण तज्ज्ञ सांगतात. इंटरगव्हर्मेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज यांनी तर पाच वर्षांपूर्वीपासून याचे गांभिर्य लोकांच्या लक्षात यावे यासाठी युनोमार्फत प्रयत्न सुरू केले आहेत. आजमितीला अमेरिका, चीनसह जगातील बहुतांश देशात पुराने थैमान घातले आहे. कोट्यावधी घरांचे नुकसान झाले आहे. अशा आपत्तींची वारंवारिता वाढणार असल्याने भविष्यातील घरांचा वेगळा आराखडा तयार होत आहे. त्यातील अनेक गोष्टी या पारंपरिक घर बांधणीच्या संकल्पनाच आहेत. त्यालाच ग्रीनहोम किंवा पर्यावरणस्नेही घर असे नाव देण्यात आले आहे. ही नवसंकल्पना आता चांगलीच रूजू लागली आहे.
घर पहावे बांधून असे म्हटले जाते. आता तर
सिमेंट आणि लोखंडाचे वाढलेले दर, वाळूची टंचाई यामुळे सध्याच्या पद्धतीने घर पहावे
बांधून याचा प्रत्यय घर बांधणाऱ्याला येतच असतो. त्यातच पावसाच्या बदलत्या रूपाने
हे आणखी कठीण बनवले आहे. दोन शयनकक्ष, एक बैठकीची खाली आणि एक स्वंयपाकगृह व
भोजनकक्ष असे चार खोल्यांचे घर ‘एक या दो बस’च्या युगात आदर्श घर बनते. या
घरांमध्ये आता अपार्टमेंटमध्ये आणि स्वतंत्र बंगला अशी दोन रूपे शहरात दिसतात. हीच
संरचना भविष्यात असणार आहे. भारतात अमेरिका, ऑस्ट्रेलियाप्रमाणे विरळ लोकसंख्या
नसल्याने जमिनीवरची घरे ही संकल्पना भारतात तरी कमी होत जाणार आहे. अशावेळी
पर्यावरणस्नेही घराची संकल्पना विचारात घेऊन घराची बांधणी करायला हवी. त्यामध्ये अंतर्गत
आणि बाह्य दोन्ही बाबी विचारात घ्यायला हव्यात.
घरांचे बांधकाम करताना जास्तीत जास्त
स्थानिक उपलब्ध घटकांचा वापर करणे आवश्यक आहे. कोकणातील लाल दगड सोलापूरमध्ये
न्यायचे आणि घर बांधायचे असले उपद्व्याप करण्यात काही अर्थ नसतो. तापमानातील,
वातावरणातील बदल अशा आयात केलेल्या वस्तूंची झीज वेगाने करतात. कोकणात लाल चिरे
आणि सोलापूरात काळ्या दगडाचे चिरे किंवा मातीच्या विटांचा वापर करायला हवा. विटांची
रचना करताना सरळ पद्धतीने न करता सरळ आणि आडव्या विटा रचून बांधकाम केले तर
भक्कमपणा येतो. पूर्वीच्या काळात अशा निव्वळ दगडांच्या शिळा रचून केलेली मंदिरांची
बांधकामे आजही टिकून आहेत. याचा दुसरा फायदा असा असतो की या रचनेमध्ये उष्णता
आतमध्ये येण्यास प्रतिबंध होतो आणि बाहेरच्यापेक्षा घराच्या आतील तापमान खूप कमी
रहाते. अपार्टमेंटचे बांधकाम करताना आज सिमेंटच्या विटांचा वापर मोठ्या प्रमाणात
होतो. मात्र मातीच्या विटा वापरण्याची वेळ पुन्हा येणार आहे.
पर्यावरणाच्यादृष्टीनेही ते गरजेचे आहे.
आज पाणी प्रमुख समस्या बनत आहे.
पिण्याच्या पाण्यासह सर्व पाणी जलसंधारणाच्या माध्यमातून उपलब्ध करून घेणे सर्व भूभागात
करता येणे शक्य नाही. अपार्टमेंटमध्येही शक्य नाही. मात्र आपण, आपल्या बंगल्यात,
घरात वापरलेले घाण पाणी चांगल्या पाण्याच्या साठ्यात मिसळणार नाही याची दक्षता
घ्यायला हवी. घरात वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची सुविधा असणेही गरजेचे
आहे कारण आज पाण्याची अनुपलब्धता नाही तर चांगले पाणी उपलब्ध होत नाही. याचे कारण
म्हणजे चांगल्या पाण्याच्या साठ्यात प्रदुषीत पाणी मिसळणे हे आहे. वापरलेले पाणी
आजूबाजूच्या झाडांना उन्हाळ्यात घातले तर आजूबाजूचा परिसर कायम हिरवा राहिल,
ज्यावर धुलीकण शोषले जातात. आज लहान मुले आणि वृद्धांना श्वसन विकारांचा त्रास
होतो, तो टाळण्यासाठी परिसर सदाहरित ठेवायला हवा.
आज घरात आपणास अनेक उपकरणे वापरणे आवश्यक
बनले आहे. यातील सर्व उपकरणे ही अद्ययावत असायला हवीत. पूर्वीच्या शीतकरण यंत्रात
वापरलेले जाणारे वायू तापमान वाढीस हातभार लावत. आता हे तंत्रज्ञान कालबाह्य झाले
आहे. फ्रीज, एसी, विद्युत ऊर्जेवर चालणारी उपकरणे दर पाच वर्षांनंतर बदलणे गरजेचे
आहे. दिवसेंदिवस ही उपकरणे अधिक पर्यावरणस्नेही बनवण्याचा संशोधक प्रयत्न करतात
आणि त्यानुसार तंत्रज्ञान बदलत जाते. आपल्या घरात प्लास्टिक येणार नाही आणि
प्लास्टिकचा कचरा बाहेर देणार नाही असा विचार घर बांधणीपासून करायला हवा. इतर कचरा
जो आहे त्यासाठी फ्लॅटमध्ये रहातानाही आपण त्यातून खत बनवण्याचा सुरुवातीलाच विचार
करायला हवा. आज पृथ्वीचा लक्षात घ्यावा असा भूभाग कचऱ्याने व्यापला आहे. घराच्या
व्यवस्थापनात शून्य कचरा संकल्पना राबवायची असेल तर त्याचा विचार सुरुवातीपूनच
करायला हवा.
घरामध्ये येणे आणि जाणे रूग्ण, वृद्ध आणि
दिव्यांगाना सहज होईल अशी घराची रचना करायला हवी. यासाठी घराचे ठिकाण चांगले
निवडायला हवे. पूर्वी मानवी वस्ती नदीच्या जवळ असायची. भविष्यात नदीच्या जवळ घर
बांधणे योग्य असणार नाही. घर उंचावर, कठीण भूभागावर बांधणे गरजेचे आहे. अचानक
जोरात कोसळणारा पाऊस हा सर्वात मोठा भविष्यातील धोका ठरणार आहे. निसर्ग ओरबडून
मानवांने आपले सुख पाहिले, आता निसर्ग त्याचा बदला घेत रहाणार आहे. हे कदाचित
अनेकांना रूचणार नाही, पटणार नाही... मात्र न्यूटनच्या नियमानुसार क्रियेला
प्रतिक्रिया येणारंच!