शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

गुरू माऊली…!

 


    चांगले शिक्षक लाभणे ही मुलांच्या भवितव्यासाठी अत्यंत गरजेचे असते. ते फक्त लिहायला-वाचायलाच नव्हे, तर माणूस म्हणून जगायलाही शिकवतात. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला योग्य मार्गावर ठेवणारे शिक्षक लाभले. त्यांनी अनेक चांगल्या सवयी लावल्या. अशा शिक्षकांपैकी एक लक्ष्मण विनायक शिंदे गुरूजी. ते गावात शिक्षक म्हणून आले आणि शाळेच्या विकासासोबत आमच्या मनाचाही विकास केला. त्यांनी विद्यार्थ्याप्रती ममत्व कसे असते, हे शिकवले. आज शिक्षक दिन. शिक्षक दिनाच्या त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देताना... त्यांच्यासंदर्भातील हा लेख..

___________________________________________________________

शिक्षक हा सदा सर्वदा ‍शिक्षक असतो. शिक्षकाला मास्तरही म्हणत. मास्तर हे नाव पालकांसाठी असायचे. त्यातही न शिकलेले पालक, मास्तर हा शब्द वापरत. शिकले-सवरलेले पालक मात्र गुरूजी म्हणत. वारकरी संप्रदायातील अनेक पालक गुरूमाऊली म्हणत. आता हा शब्द फारसा ऐकावयास मिळत नाही. खरे तर माऊली म्हटले की संत ज्ञानेश्वर डोळ्यासमोर येतात. त्यांना मिळालेली उपाधी ‘माऊली’ गुरू शब्दासोबत जोडून वापरली जात असे. खरंच शिक्षकांमध्ये एक माऊली असते. नेहमी आपल्या बाळाचे भले चिंतणारी. मुलांने चांगला माणूस बनावे, असे सदैव विचार करणारी. शिक्षक अनेक प्रकारचे असतात. काही शिक्षक ‘चुकीला माफी नाही’ म्हणत नेहमी मारणारे. अशा गुरूंना मारकुटे गुरूजी असे टोपणनाव देत नव्याने बारसे होते. त्यांनी मारायचे सोडले तरी नाव काही जात नाही. त्यांची बदली झाल्यावर गुरूजी त्या गावी पोहोचण्यापूर्वी त्यांचे हे नाव पोहोचलेले असे. आज मुलांना मारण्यास बंदी घातली असल्याने असे मारकुटे गुरूजी नाव कोणाला मिळत नसावे. आमच्या बालपणी मात्र असे मारणारे गुरूजी होते. मात्र त्यांच्याही मनात ‘मार दिल्यावर विद्यार्थी सुधारेल’, हीच भावना असायची. आता अनेक शाळांमध्ये गुरूजीऐवजी टिचर म्हणतात. मात्र टिचर या शब्दात गुरूजींमध्ये असणारा आदर, भीती आणि स्नेह दिसत नाही.

या गुरूजींबद्दल गावात अपार आदर असायचा. गावात आलेली अनेक घरातील पत्रे वाचून दाखवायची जबाबदारी गुरूजीवर असायची. अडल्‌या-नडल्या गोष्टींवर सल्ला देणारे ते सल्लागार असायचे. अगदी मुलीचे लग्न करायचे, असेल तर स्थळ पाहायलाही गुरूजींना सांगण्यात येत असे. शेतात पिकलेल्या भाज्या, फळांचा वाणवळा गुरूजींच्या घरात हमखास सर्वात अगोदर पोहोचायचा. यातून द.मा. मिरासदार, शंकर पाटील आणि इतर लेखकांना अनेक कथांचे विषय मिळाले. पुढे काळ बदलत गेला. वाहने आली. प्रवास वेगवान झाला. गावाच्या मुलांत आपल्याही मुलाला पाहणारे गुरूजी, पुढे गावातील मुलांच्या भवितव्यापेक्षा आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता करू लागले. त्यांनी शहरात राहून गावातील शाळेत येणे-जाणे सुरू केले... आणि ही संस्कृती पुर्णपणे लुप्त होत गेली. गुरूजींबद्दलच्या त्या भावना हळूहळू लुप्त होत गेल्या असे वाटते.  

आमचे गाव चिंचोली. बालाघाटच्या डोंगराच्या कुशीत वसलेले. रेल्वे गावाजवळून जात असताना आमच्या गावी रेल्वे स्टेशन नाही. बार्शी-लातूर हायवे गावाजवळून जातो. पण तोही आमच्या गावापासून साधारण पाचशे मीटर अंतरावरून जाणारा. आमच्या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होती. चौथीपर्यंत. गावाला शिक्षणाचा समृद्ध वारसा होता. माझे आजोबा, वडील सर्वजन गावातील शाळेत शिकून गुरूजी झालेले. एवढेच काय, या गावाचा लौकिक मास्तरांचे गाव असा झालेला. त्याचे कारण म्हणजे गावातील ज्येष्ठ नागरिकांतील सत्तर टक्के लोक प्राथमिक शिक्षक होते. आमच्या बालपणी या गावातील शाळेत शिक्षक फारच चांगले होते. आज गावाकडे जाणे कमी झाले आहे. अनेक वर्षात नेमके कोण शिक्षक आहेत, याची माहिती नाही. मात्र त्या वेळचे सर्व शिक्षक आजही डोळ्यासमोर येतात.  

तसा मी फारच नशिबवान होतो. बालवाडीची संकल्पना खेड्यात पोहोचण्यापूर्वीच्या त्या काळात बहिणींचा हात पकडून मी सहा वर्षांचा होण्यापूर्वीच शाळेत जाऊ लागलो. भावाला सांभाळण्यासाठी शाळा सोडणाऱ्या अनेक मुली असत. आमच्या गावातील शाळेत त्याकाळी असणारे मुळे गुरूजी आणि काशिद गुरूजींनी लहान भावाला किंवा बहिणीला शाळेत घेऊन येण्याची मुक्त परवानगी दिली होती. ही संस्कृती हे दोन शिक्षक असेपर्यंत कायम होती. पुढे वय वाढले आणि सहा वर्षे होताच शाळेत रितसर नाव नोंदवण्यात आले. मुळे गुरूजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर बापू दगडू जानराव हे एक किलोमीटरवर असणाऱ्या पांगरीचे गुरुजी आमच्या शाळेत आले. पहिली काशिद गुरूजींच्या हाताखाली शिकता आले. तेही सेवानिवृत्त झाले. त्यानंतर घोळवेवाडीचे मोतीराम दगडू खाडे गुरूजी शाळेत आले. त्यांनी आमचे पाढे आणि वाचन चांगले करून घेतले. तोपर्यंत शाळेचा पट चांगला वाढला. प्रत्येक वर्गात वीसपेक्षा जास्त मुले झाल्यामुळे आमच्या गावातील लक्ष्मण विनायक शिंदे गुरूजी गावात बदलून आले.

आता हे गुरूजी गावातील असल्याने गावातच राहणार होते. एरवी आम्हाला गावात काही वाटत नसायचे. बिनधास्त उनाडक्या चालायच्या. आता गावातील गुरूजी आल्यामुळे आम्हा मुलांची मोठी पंचाईत झाली होती. गुरूजी त्यांच्या शेतात जाताना येतानाही आपणास पाहू शकतात. त्यांना एखादी गोष्ट नाही आवडली तर शाळेत फटके मिळू शकतात, हा धाक सर्वच मुलांच्या मनात निर्माण झाला होता. त्यांची शेती, गावाच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूला होती. त्यांचे घर गावाच्या मध्यभागी होते. घरातून बाहेर पडले की मुख्य चौक होता. त्यामुळे सर्वच मुलांची पंचाईत झाली. पश्चिमेला पिकणारी शेती. काळ्या मातीची. त्यामुळे तो भाग खेळण्यासाठी उपयोगाचा नव्हता. यावर उपाय म्हणून आम्ही मुलांनी पूर्व बाजू निवडली. या बाजूला मुरमाड जमीन होती. तसेच या भागात जाताना त्यांच्या घरावरून जावे लागत असे. त्यातच हा रस्ता निळकंठेश्वर मंदिराकडे जाणारा. गुरूजी नेहमी मंदिरात जाणारे. त्यामुळे कोठेही असले तरी मुले खेळताना सावधपणा बाळगत.


गुरूजी गावात प्रत्यक्ष हजर होण्यापूर्वीच चर्चा सुरू झालेली. तसे ते गावात फार राहात नसत. शेजारी असणाऱ्या मुलांनाही त्यांची सविस्तर माहिती नव्हती. पण आम्ही त्यांना लक्ष्मण तात्या म्हणायचो. त्यावेळी ते आमचे गुरूजी नव्हते. त्यांच्या पत्नीला आम्ही वहिनी म्हणायचो. नात्याने ते आमचे भाऊ आहेत, असे सांगण्यात येत असे. वहिनींचे नाते मात्र अवघड होते. एकिकडे ती भावाची पत्नी होती, तर दुसरीकडे माझ्या चुलत मामांची मेहुणी होती. पूर्वी सुट्टीत गावी आल्यानंतर मोकळेपणाने बोलत असत. आम्ही त्यांना वहिनी म्हणायचो. तात्या गावात रूजू झाल्यानंतर वहिनींना पहिल्यासारखे मोकळेपणाने बोलता येईनासे झाले. लक्ष्मण तात्यांना मात्र आम्ही फक्त गुरूजी म्हणू लागलो.

ते गावातील शाळेत रूजू झाले. साधारण साडेपाच फूट उंची. गव्हाळ रंग. लांब नाक. सडसडीत शरीरयष्टी. सरळ नाक. कामाची नेहमीची सवय राखली असावी. मोठे कपाळ. उभट चेहरा. लांब बोटे. चेहऱ्याच्या प्रमाणात थोडेसे उभट कान. कायम पांढरेशुभ्र कपडे असायचे. मी एकदाही त्यांना रंगीत कपडे घातलेले पाहिले नाही. तेही पांढरा नेहरू शर्ट आणि पायजमा असा त्यांचा ड्रेस ठरलेला असायचा. पांढऱ्या  कपड्याना त्यावेळच्या रितीप्रमाणे कायम नीळ देऊन आणखी शुभ्र केलेले असे. कायम स्वच्छ सफेद कपड्यातील गुरूजी त्यामुळे सर्वात उठून दिसत असत. सण, उत्सवाच्या दिवशी कपाळावर कुंकवाचा लाल गंध असायचा. तो त्यांना शोभून दिसत असे. या त्यांच्या पेहरावामुळे गुरूजी आणखी उठून दिसत असत.

 हे नवे गुरूजी आले आणि आमचाच वर्ग त्यांच्याकडे देण्यात आला. ते सर्वांपेक्षा जास्त शिकलेले गुरूजी होते. शाळेत आल्याबरोबर त्यांनी आमच्यातले पाणी मोजायला सुरुवात केली. ‘अभ्यास करणारी, जमलं तर अभ्यास करणारी आणि अभ्यास टाळणारी’ या तीन गटातच मुलांची विभागणी होते असे ते म्हणत. ‘सर्वांना डोकं सारखेच असते, कोणी अभ्यास करण्यासाठी वापरते तर कोणी अभ्यास न करण्याचे कारण काय सांगायचे, याचा विचार करण्यासाठी वापरते,’ असे त्यांचे म्हणने होते. त्यामुळे अभ्यास केला पाहिजे. खूप शिकले पाहिजे असे अनेक मुलांना वाटू लागले. हा त्यांचा आल्याआल्या मुलांवर झालेला सकारात्मक परिणाम होता.

आम्ही या गुरूजींच्या वर्गात आलो तेव्हा चौथीत होतो. आमची परीक्षा केंद्रावर होणार होती. तेव्हा आजच्यासारखे आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण नव्हते. तसे असते तर अजून काहीजन शिकले असते, मात्र त्यांना चांगले लिहायला, वाचायला आले असते का असा प्रश्न पडतो. तर लक्ष्मण गुरूजी शाळेत रूजू झाले आणि वातावरण थोडे बदलले. गुरूजी तसे खूप मृदू होते. मराठी भाषेचा अभ्यास चांगला होता. कविता शिकवताना ते तल्लीन होऊन जात. गणिताची पद्धत एकदा, दोनदा, तीनदा समजावून सांगत. तोंडी गणिते सांगण्यात तर त्यांचा हातखंडा होता. त्यांनी आम्हाला चवथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसायला भाग पाडले. तोपर्यंत आमच्या शाळेतून या परीक्षेला कोणी बसले नसावे. मूळातच चौथीसाठी शाळेत परीक्षा न होता, केंद्रावर जावे लागत असताना हा नवीन परीक्षेचा घाट कशाला, असा काही पालकांचा प्रश्न होता. त्या प्रत्येकाला गुरूजींनी समजावून सांगितले. केंद्र परीक्षेचा अभ्यास आणि शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास. असा... अभ्यास एके अभ्यास, या नव्या गुरूजींनी सुरू केले. लवकरच त्यांच्या लक्षात आले की त्यांनी ज्या सात विद्यार्थ्यांना निवडले होते, त्यातील जवळपास सर्वच कलाकार आणि अधिकचा अभ्यास म्हणजे लादलेला असे समजून तो टाळत आहेत. अर्थात वर्गातील इतर मुले चांगली खेळत बसलेली असताना आपण अभ्यास करायचा, हे त्या बालवयात अन्यायकारक वाटणे नैसर्गिक होते. यावर त्यांनी आम्हाला अभ्यासाला बसवण्यासाठी वेगळा मार्ग निवडला.

त्यांनी त्यांच्यादृष्टीने क्षमता असणाऱ्या आम्हा मुलांच्या घरी, एक दिवस संध्याकाळी फेरी मारली. उद्यापासून तुमचा मुलगा संध्याकाळी माझ्याकडे घरी अभ्यासाला येईल, असे सांगितले. वडील शिक्षक असल्याने आमच्या घरातून नकाराचे कारण नव्हते. गुरूजींची ही तळमळ आणि प्रामाणिक प्रयत्न इतर पालकांच्याही लक्षात आले असावेत. आम्ही चार विद्यार्थी गुरूजींच्या घरी अभ्यासाला जाऊ लागलो. त्या काळी आमच्या गावात विज आलेली नव्हती. त्यासाठी रॉकेल विकत आणून आमचा हा अभ्यास ते घेत होते. आम्ही अभ्यासच करत आहोत, याकडे त्यांचे लक्ष असे. आम्ही अभ्यास करत असताना ते कोणते ना कोणते पुस्तक वाचत बसलेले असायचे. आम्हाला शिकवायच्या पुस्तकाव्यतिरिक्त अन्य पुस्तकांचे त्यांचे वाचन मोठे होते. इतर शिक्षकांपेक्षा ते अधिक संदर्भ सांगायचे. त्यांचे हे आम्हाला सांगणे या वाचनातून आल्याचे पुढे मी शिक्षक झाल्यानंतर लक्षात आले. मात्र त्यांच्या येण्याने दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतही या गुरूजींच्या तावडीतून आमची सुटका होत नसायची.

चौथीच्या परीक्षेचे केंद्र पांगरीच्या शाळेत असायचे. तेथे तालुक्यातील जवळपास तीसेक शाळातील मुले येऊन परीक्षा देत असत. गुरुजी शाळेजवळ सर्व मुलांना एकत्र करत. तेथून आमची परेड पांगरीला निघत असे. परीक्षा पूर्ण होईपर्यंत ते तेथेच एखादे पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचत बसत असत. त्यानंतर परीक्षेत कोणते प्रश्न विचारले होते. उत्तरे काय लिहिली याची चर्चा करत प्रत्येकाला घरी पोहोचवत असत.

त्याचसोबत गावातील धार्म‍िक कार्यक्रमात सहभागी व्हायची सवय त्यांच्यामुळेच लागली. गावात कोणत्या ना कोणत्या ग्रंथाचे म्हणजे रामविजय, हरिविजय, नवनाथ ग्रंथाचे पारायण सुरू असायचे. ती पद्धत अजूनही काही गावात सुरू असते. एकजण ग्रंथातील ओवी वाचत असे आणि दुसरा त्याचा अर्थ सांगायचा. दररोज असे एका अध्यायाचे पारायण होत असे. एकदा गावातील वाचन करणारा बाहेरगावी गेला होता. तो त्या दिवशी आला नाही. गुरूजींनी मला वाचायला सांगितले. मी गुरू आज्ञा प्रमाण मानून पहिल्यांदा नवनाथाच्या पोथीतील सातवा अध्याय वाचला. तो लोकांना आवडला. त्यातून मी पट्टीचा पोथी वाचणारा बनलो. त्या वयातही मला गावोगावी निमंत्रणे येऊ लागली. त्यांनी पहाटे लवकर उठायची सवय लावली. श्रावण महिन्यात तर ते आम्हाला पहाटे साडेपाचला उठवायचे. चरवी घेऊन त्यांच्याबरोबर नदीवर जावे लागायचे. नदीच्या डोहात डुंबायचे. तीच आमची आंघोळ असायची. गुरूजी आमच्यापुढे असायचे. आंघोळीनंतर नदीच्या वरच्या अंगाला जाऊन चरवी पाण्याने भरून घ्यायची. मंदिरात जायचे. मंदिराचा परिसर स्वच्छ असायचा. चरवीतील पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालायचा. असा महादेवाला अभिषेक घालण्याचा कार्यक्रम संपूर्ण महिना चालत असे. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आम्हाला ते चालत रामलिंगच्या मंदिरात घेऊन जात असत. जाताना अनेक वनस्पतींची ओळख करून देण्याचे गुरूजींचे काम सुरू असायचे. चिंचोलीपासून दुर्गादेवीपर्यंत रेल्वेच्या ट्रॅकने सर्वात कमी अंतर भरायचे. गप्पा मारत तीन किलोमीटरचे अंतर कसे काटले जायचे, ते कळायचेही नाही. मुले-मुली कोणाचीच यातून सुटका नसायची. या सर्व सहली खूपच आनंददायी होत्या.

विद्यार्थ्यांचा पट शासन नियमानुसार प्रत्येक वर्गात वीसपेक्षा जास्ती होता. या नव्या गुरूजींनी गावातील लोकांच्या डोक्यात शाळा सातवीपर्यंत करण्याचा प्रस्ताव ठेवला. सरपंच आणि पाटील दोघांनाही कल्पना आवडली. तोपर्यत आमची चौथीची परीक्षा संपून निकाल लागला होता. आमचे दाखले काढण्यात आले होते. पांगरीच्या सर्वोदय विद्या मंदिर प्रशाला या शाळेत आम्ही प्रवेश घेतला होता आणि अशा वेळी गावात पाचवीचा वर्ग सुरू करण्यास मान्यता मिळाली. गावातील पाचवी इयत्तेच्या पहिल्या वर्षात आम्ही प्रवेश घेतला. पुढे सहावीचा वर्ग सुरू झाला. पाचवी असो वा सहावी आमचे वर्गशिक्षक लक्ष्मण गुरूजीचे राहिले. सहावीत असतानाची एक आठवण मात्र मनात कायमची कोरली गेली आहे.

शिंदे गुरूजींचा मार न खाणाऱ्यामध्ये मी आणि माझा मित्र दिलीप गोरख शिंदे आम्ही दोघे होतो. त्या वेळी  आम्ही सहावीत होतो. त्या दिवशी दुपारच्या सत्रातील शाळा सुरू होती. वर्गातील एका वांड मुलांने गुरूजींशी वाद घालायला सुरुवात केली. तोही एका शिक्षकाचा मुलगा होता. त्याचे वडील दुसऱ्या गावात नोकरीस होते. त्या दिवशी दिलीप मात्र गैरहजर होता. त्या मुलाचे म्हणणे असे होते की, ‘गुरूजी ‘पार्सलिटी’ करतात. राजा (अस्मादिकांचे टोपण नाव) आणि दिलीपला त्यांचे चुकले तरी गुरूजी मारत नाहीत.’ यावरून तो जरा मर्यादा सोडून जोरात बोलला. तसे तर ते चूकल्यानंतर कोणालाच सोडत नसत. सर्वानाच छडीचा प्रसाद देत. त्या वेळी वर्गात गद्य वाचन सुरू होते. झाले, शिंदे गुरूजीनी माझ्याकडून गद्यवाचन करताना एका ठिकाणी थोडी चूक झाली. ती नेमकी टिपली. ‘न’ आणि ‘ण’च्या उच्चारातील ती चूक. आज मोबाईल युगात या चुका सर्रास होतात. गुरूजींनी छडीचा जोरात वापर केला. हातावर तीन चार छड्या बसल्या. मला खूप वाईट वाटले. मनातून खूप खट्टू झालो. शाळा संपेपर्यंत गप्प राहिलो. गुरूजींचा खूप राग आला होता. घरी आलो. कोणाशीच बोलावे वाटत नव्हते. मी असा का वागतो, हे आईलाही कळत नव्हते. साडेसात वाजले आणि आवाज आला, ‘गुरूजी आहेत का घरात?’ दारात लक्ष्मण शिंदे गुरूजी होते. आल्याआल्याच ते गदगदल्या आवाजात म्हणाले, ‘राजा कुठाय. मी आज त्याला मारायला नको होतं. बाळूच्या (वांड मुलगा) बोलण्यानं माझा तोल गेला आणि मी राजाला मारलं.’ वडिलांनी बोलावल्यावर मी बाहेर आलो. गुरूजींनी जवळ बोलावले. मी त्यांच्या जवळ गेलो. गुरूजींनी माझा हात हातात घेतला आणि त्याचा पापा घेतला. ‘माफ कर’, गुरूजी गदगदल्या आवाजात म्हणाले’. त्यांच्या त्या मायेच्या उबेतून हात सोडवून घेताना त्यांच्या डोळ्यातील दोन थेंब हातावर पडले. त्या थेंबांनी माझ्या मनातील राग धूवून काढला आणि त्या दिवशी लक्ष्मण गुरूजींवरचे माझे प्रेम आणखी वाढले. त्याचंसोबत विद्यार्थ्यांच्याबद्दल शिक्षकाच्या मनात ममत्वाची भावना ठेवण्याचा संस्कार देऊन गेले.

सुरुवातीपासून आमच्या शाळेत आणखी एक उत्सव असायचा. हा प्रसंग खरेच मनोरंजनाचा  असायचा. लक्ष्मण गुरूजी आल्यानंतर याची वारंवारिता वाढली. जी मुले नेहमी शाळा बुडवत, त्यांना गुरूजी उचलून आणायला सांगत. त्यासाठी पाच मुलांना  पाठवण्यात येत असे. त्यातील चार दांडगट मुले असत आणि एक त्यांच्यादृष्टीने हुशार आणि त्यांच्या पूर्ण विश्वासातील असायचा. कोणाला उचलून आणायचे त्या मुलांची ते नावे सांगायचे. हे सर्व अचानक असे. शाळेत येईपर्यंत कोणाला उचलायचे, हे माहीत नसायचे. मग ही मुले जाऊन शाळेत न आलेल्या मुलाला शोधायचे. त्याला शाळेत यायचे नसायचे. मात्र गुरूजींची आज्ञा प्रमाण असे. प्रथम त्याची विचारपूस घरी होत असे. आई त्या मुलाला शाळेत जा, असे सांगून कंटाळलेली असायची. अनेकवेळा हा पठ्ठ्या लपलेला असायचा. अशा घरातील आईच तो कोठे लपला, हे सांगायची. कधीकधी मुले परसबागेत जाऊन लपत आणि आम्ही पकडायला गेलो की मोकळ्या रानातून पळत सुटत. इतर मुले त्याच्यापेक्षा चपळ असत. ती त्याला पकडत. मग चार दांडगट मुले हाताला आणि पायाला पकडून त्याचा झुला करायची. दोघे हात पकडत आणि दोघे पाय पकडत. त्याला उचलून शाळेत आणत.

त्याला पकडल्याबरोबर त्याचा दंगा सुरू व्हायचा. जोरजोरात आईला तो पहिल्यांदा ओरडायचा. रस्त्यावर आले की त्याची बडबड मुलांना उद्देशून सुरू व्हायची. शाळेत येताच हा पठ्ठ्या जोरात रडायला सुरुवात करायचा. शिंदे गुरूजी छडी घेऊन त्याला बदडायचे. शाळेत नियमित येणाऱ्याकडून उत्तर चुकले तरी जास्तीत जास्त समजावून सांगायचे. अपवादानेच छडी वापरायचे. मात्र शाळा बुडवली की त्यांचा पारा चढायचा. त्यांच्या शिकवण्याने आमचे शिकणे सुंदर झाले. त्यांनी चवथीपर्यंतची शाळा सातवीपर्यंत वाढवली. आम्ही त्या सुविधेचे पहिले लाभार्थी. वर्ग वाढल्याने गावातील विठ्ठल पाटील नावाचे गुरूजी या शाळेत बदलून आले. त्यांनी सातवीचा वर्ग मागून घेतला आणि शिंदे गुरूजींचा आणि आमचा शाळेतील संबंध संपला. आमच्याच शाळेत असूनही आम्हाला त्यांचे मार्गदर्शन मिळत नसे. मात्र त्यांच्यामुळेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी म्हणून सातवी उत्तीर्ण झालो. अगदी सातवीची परीक्षा पूर्ण होईपर्यंत त्यांनी आमच्या अभ्यासाची विचारपूसही केली नाही. कधी-कधी याचे वाईट वाटत असे. मात्र आपल्याकडे अधिकृतपणे वर्ग नसताना, दुसऱ्या शिक्षकाच्या वर्गातील विद्यार्थ्यांची चौकशी करून गैरसमजाचे वातावरण निर्माण होऊ नये, यातून ते ही दक्षता घेत होते. ते त्यांच्या नैसर्गिक स्वभावधर्मास अनुसरून होते, हे पुढे खूप वर्षांनी लक्षात आले.


पुढे लक्ष्मण गुरूजींची बदली अन्य गावात झाली. गावातील राजकारणातून ही बदली झाल्याची चर्चा कानावर आली. मात्र हे गुरूजी गावातील राजकारणात कधीच लक्ष झालत नसत. आपण भले, आपले काम भले आणि शिकपणे भले... असा गुरूजींचा स्वभाव होता. ते गावातील अन्य लोकांमध्ये कधी दिसायचे नाहीत. कामाशिवाय कोणाकडे जात नसत. त्यांना सुट्टीच्या दिवशी कायम कामात पाहायचो. आपण शिकलो म्हणून कामाची लाज वाटायचे कारण नाही, हा संस्कार गुरूजींच्या कृतीतून आमच्या मनावर कोरले जात होते. त्यामुळेच अगदी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्यानंतर शेतातील कामे करण्याची लाज कधी वाटली नाही. अगदी घरातील चुलीसाठी लाकडे आणण्यापासून ती फोडण्यापर्यंत सर्व काम गुरूजी करायचे. ज्वारीचे पीक काढणीला आले की धाटे उपटण्यापासून खळे होईपर्यंत शेतातील फेरी कधीच चुकत नसे. याचे नकळत संस्कार बालमनावर होत असत.

शाळा आमच्यासोबत वाढली, म्हणजे इयत्ता वाढत गेल्या. काही वर्ष सातवीपर्यंत शाळा छान सुरू राहिली. पुढे इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या. स्कूल बस खेड्यापाड्यात मुले गोळा करत फिरू लागल्या. गरीब पालकांपर्यंत शिक्षणाचे महत्त्व पोहोचल्याने पोटाला चिमटा देऊन ते इंग्रजी माध्यमाच्या शाळात मुलांना पाठवू लागले. शाळेचा पट कमी होत गेला. सातवी, सहावी बंद होत पुन्हा चवथीपर्यंतची शाळा राहिली. मध्ये समजले की गावातील शाळा पूर्णपणे बंद पडली आहे. खूप वाईट वाटले. सरपंच आणि बाकीच्या नेत्याकडे शाळा चांगली चालावी, याबद्दल अनेकदा चर्चा केली. शाळेला पूर्वीचे वैभव राहिले नाही.

इतर शिक्षकांची नंतर अपवादानेच भेट झाली. त्यातील बहुतेक शिक्षकांचा इहलोकीची प्रवास संपला आहे. मात्र शाळेजवळून जाताना या सर्व गुरूजनांच्या आठवणी येतात. त्यांचे रूप समोर उभे राहते, विलास नाव असतानाही राजा म्हणून हाक मारत असल्याचे जाणवते. तसेच हातात छडी घेतलेले, संस्काराचे धडे देणारे गुरूजन डोळ्यासमोर येतात आणि डोके त्यांचे पाय शोधत राहते.

त्यातील आम्हाला शिकवणाऱ्या चांगल्या शिक्षकांतील लक्ष्मण शिंदे गुरूजी गावात प्रवेश करतानाच भेटतात. त्यांनी निवृत्तीनंतर शेतात घर बांधले. गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पण गावाच्या हद्दीपासून २०० मीटरवर छोटेखानी पक्के घर बांधले आहे. ते तिथे मोठे घरही बांधू शकले असते. मात्र ‘निसर्ग ओरबडू नये, हवे तेवढेचं घ्यावे’, असा विचार सांगणाऱ्या गुरूजींनी आटोपशीर घर बांधले. गावाबाहेर जाणाऱ्या एकमेव रस्त्यावर घर असल्याने जाता-येता घराचे दर्शन होते. अनेकदा तेथे थांबावेसे वाटते. मात्र गुरूजी काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. वर्गातील अभ्यासक्रम नेटकेपणाने शिकवणारे, अतिरिक्त माहिती देणारे, पुस्तक वाचनाचे महत्त्व पटवून देणारे, स्वत:ला कायम कार्यरत ठेवणारे, निसर्गाला हानी पोहोचू नये म्हणून काळजी करणारे, चांगल्या सवयी मुलांत रूजवण्यासाठी धडपडणारे, असे तात्या उर्फ लक्ष्मण गुरूजी... आजही कार्यरत असतात.

नांदेडचे माधव जाधव सर ‘कुळवाडी’ हा दिवाळी अंक प्रसिद्ध करतात. गतसाली त्यांनी शालेय जीवनासंदर्भात लेख लिहावयास सांगितले. तो लेख लिहिताना लक्ष्मण गुरूजींच्या आठवणी दाटून आल्या. काही दिवसांनी गावी जाणे झाले. योगायोगाने गुरूजी दिसले. आवर्जून थांबावेसे वाटले. त्यांनी जे शिकण्यासाठी आवश्यक सर्व काही शिकवले होतेच, पण त्याही पलिकडे विद्यार्थ्यांशी ममत्वाने वागण्याची शिकवण दिली होती. तो त्यांनी अभ्यासक्रमाबाहेरचा एक धडा शिकवला होता. आपली कृती चुकली असेल तर क्षमा मागण्यात कोणताही कमीपणा नसतो, हेही शिकवले. कोणाबद्दलही वाईट न बोलणारे लक्ष्मण गुरूजी, कायम आठवतात. मला लाभलेले सर्वच शिक्षक चांगले होते. त्यांनी आम्हाला चांगले विद्यार्थी बनवण्यासाठी मनापासून कष्ट घेतले. मात्र त्यापुढे जाऊन चांगला माणूस बनण्यासाठी, चांगला शिक्षक होण्यासाठी आवश्यक कौशल्ये देणारे लक्ष्मण गुरूजी वेगळेच!