शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

मनात वसलेला आंबा!

आंबा फळ सर्वांचे आवडते. रविंद्रनाथ टागोर यांना ज्या वर्षी आंबा खाल्ला नाही ते वर्ष वाया गेले असे वाटले. तो लोकसंस्कृतीत पूर्ण रूजला आहे. कोकणामध्ये इतर भागात वापरल्या जाणाऱ्या म्हणींना आंब्यामध्ये गुंफले गेले आहे. तर लोकसंस्कृतीतील अनेक गीतात आंबा आढळतो. कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर आंब्याचे सुंदर वर्णन करतात. तर इंद्रजित भालेराव अनेक कवितामध्ये विविध रूपात गुंफतात. अशा आंब्यावरील लेखाचा उत्तरार्ध. या लेखात आंब्यावरील म्हणी, कविता आणि बालपणीच्या आठवणी….

लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी पुढील लिंकवर भेट द्या  http://drvnshinde.blogspot.com/2021/07/blog-post.html

___________________________________________________________

ll ३ ll 

आंब्यावरून अनेक म्हणी आणि वाक्प्रचार आलेले आहेत. महाराष्ट्राच्या इतर भागात असलेल्या म्हणींशी साधर्म्य सांगणाऱ्या म्हणी आंब्याला गुंफुन बनल्या आहेत. प्रामुख्याने कोकणात अशा म्हणी वापरल्या जातात. ‘आंबा खावा वाटला म्हणून झाड लावायचे’, ही ‘तहान लागल्यावर विहिर खोदणे’ याच्याशी साधर्म्य सांगणारी म्हण वापरतात. ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ याप्रमाणेच ‘पिकल्या आंब्याचा घमघमाट फार’ ही म्हण आली आहे. ‘दुधाची तहान ताकावर’ या अर्थाची ‘आमरसाची तहान पन्ह्यावर’ ही म्हण वापरतात. ‘लहान कोय, अन् मोठे फळ’ ही म्हण ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ या अर्थाने वापरण्यात येते. ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचे तो कार्टे’ ऐवजी ‘आपला तो देवगड, अन् दुसऱ्याचा तो पायरी’ किंवा ‘आपले ते आंबा खाणे, अन् दुसऱ्याचा तो हावरटपणा’ असे सहज बोलले जाते. ‘आपलेच दात, अन्‍ आपलेच ओठ’ या म्हणीऐवजी ‘आपलीच साल, अन् आपलीच कोय’ अशी म्हण वापरतात. ‘पळसाला पाने तीनच’ ऐवजी ‘कुठेही जा, आंब्याला कोय एकच’, ‘आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते’ ऐवजी ‘आपला सडका दिसत नाही, पण दुसऱ्याचा लागलेला दिसतो’, ‘पी हळद, अन् हो गोरी’ ऐवजी ‘खा आंबा आणि हो जाडा’, ‘तेरड्याचा रंग तीन दिवस’ ऐवजी ‘आंब्याचा सीझन तीन महिने’, ‘घरात नाही दाणा आणि हवालदार म्हणा’ ऐवजी ‘रस गेला करायला, अन् आंबा नाही पिळायला’, तसेच ‘नाव सोनुबाई, अन् हाती कथलाचा वाळा’ प्रमाणे ‘औषधाला नाही आंबा, अन् गाव आंबेगाव’, तसेच ‘ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये’ ऐवजी ‘फुकट मिळाले म्हणून पाटीभर खाऊ नये’ अशा अनेक म्हणी वापरल्या जातात. ‘आत पिकला, खराब झाला’, ‘कोकणात शेजारी आंबा विकत घेईल काय’, अशा काही वेगळ्या म्हणीही आहेत. एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना दोषही स्वीकारावे लागतात, या अर्थाची ‘जो खाईल आंबा, तो सोसेल ओळंबा’ ही म्हण आली आहे. सर्वत्र वापरली जाणारी आणि शाळेत अनेक वेळा शिक्षकांच्या मुखातून ‘वाईट संगत सोड’ अशी शिकवण देताना ‘सडक्याबरोबर चांगला आंबाही सडतो’ ही म्हण प्रत्येकाने ऐकलेली असते. आंब्या इतक्या म्हणी इतर कोणत्याही फळावरून, झाडावरून आलेल्या नाहीत.

मराठी साहित्यात आंबा मोठ्या प्रमाणात भेटतो. लोकसाहित्यात मंगळागौरीच्या गाण्यामध्ये ‘आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो’, हे गाणे आवर्जून असते. ‘लोकसंस्कृतीतील स्त्रीरूपे’ हे पुस्तक वाचताना आंबा येथील संस्कृतीत किती रूजला आहे, हे दिसते. आई आपल्या बाळांना वाढवताना आंब्याच्या आणि जांभळीच्या रूपात पाहते. बाळाला ‘लावणीचा आंबा’ असा उल्लेख अनेकदा आढळतो. ती म्हणते, ‘लावणीचा आंबा l पाणी घालती कौलाने ll नेणंता बाळ माझा l आंबा वाढतो डौलाने ll लावणीचा आंबा l पाणी घालती वंजळीनं ll साळून चालं घेतली जांभळीनं ll’ मुलीच्या नाजूक चेहऱ्याकडे पाहून आंब्याच्या मोहोर आठवतो, या अर्थाची रचना मिळते. आणखी एका लोकगीतात मुलीकडे वाकड्या नजरेने पाहणारास आई सुनावते, ‘वाटेच्या वाटसरा l वाटन जाय उगा ll पाडाला आला आंबा l नाही तुझ्या हाताजोगा ll’. लग्नावेळी गायील्या जाणाऱ्या लोकगीतात आंब्याच्या तोरणाचे वर्णन येते. लग्नापूर्वीची शिदोरी आणि लग्नानंतरही दोन्हीकडून पोळ्यांच्या शिदोरीसोबत आंब्याची दुरडी पाठवली जात असे. यासंदर्भातही एक जावई आंदण म्हणून आंबे मागतो अशी रचना मिळते. ‘लाडकी वं लेक, लाडाकोडाचा जावई, आंदण मागतं, आंबेखालनं गव्हाई’. सासूरवास सहन करलेल्या स्त्रीचे मन ‘भिरूड लागलिया l आंब्याच्या फोकयीला ll अंतरीच गुज l कशी सांगू मी लोकयीला ll’ या कडव्यात अचूक मांडले आहे. गरोदर स्त्रीला आंबा खावा वाटतो. त्याचेही वर्णन ‘गर्भीन नारी l तुझा गर्भ ग लाडाचा ll हवशा कंत l आंबा तोडतो पाडाचा ll’ या पंक्तीमध्ये येते. त्याच गाण्यात बहिणीला अन्न खावेसे वाटत नाही. बहिणीला पाडाचा आंबा मिळावा आणि तो कोणी तोडू नये म्हणून भाऊ बागवान झाल्याचे वर्णन येते. गरोदर स्त्रीला सीता, रूक्मिणीचे किंवा देवीचे रूप मानून अनेक रचना आढळतात. ‘सीताबाईला डव्हाळं l खाती मुरमाचं खडं l रामाच्या बागमंदी l कलमी आंब्याला आला पाड ll’ या ओळीत सीतेच्या रूपात गरोदर स्त्रीला पाहात असताना अनेक वर्षांपासून आंब्याची कलमे बांधण्याची पद्धत असावी, हे दिसते. सर्वांना हवेहवेसे वाटणारे आपले लेकरू वर्णिताना माय ‘लाडका एवढा लेक l हाय आईबापाचा लाडाईचा l आंबा केसरी पाडाइचा ll’ असे म्हणते. पूर्वी बहिणीची मुलगी सून म्हणून आणली जायची किंवा मुलगी, बहिणीच्या घरी दिली जात असे. यानंतर बहिण-भाऊ हे विहिण आणि व्याही होत. याचे ‘आंब्याच्या झाडा खाली l अशी बसली पाखरं ll इनइवाई एका मातीची लेकरं ll’ यापेक्षा सुंदर वर्णन होऊच शकत नाही. याशिवायही अनेक असंग्रहित गाण्यांमध्ये आंबा भेटतो. आंबा या संस्कृतीत इतका रूजला असल्याने साहित्य आणि संस्कृतीच्या प्रत्येक टप्प्यावर तो दर्शन देत राहातो.

संतसाहित्यातही आंब्याचा संदर्भ येतो. समर्थ रामदासांना वृक्षांचे ज्ञान होते. बागेत कोणते वृक्ष लावावेत याची यादीच त्यांनी एका काव्यात दिली आहे. त्यांचे आंब्यावर विशेष प्रेम होते. आंब्याचे त्यांनी समर्पक शब्दात वर्णन केले आहे. ते लिहितात, ‘ऐका, ऐका थांबा, थांबा l कोण फळ म्हणविले बा ll सकळ फळांमध्ये आंबा l मोठे फळ ll त्याचा स्वाद अनुमानेना l रंग रूप हे कळेना ll भूमंडळी आंबे नाना l नाना ठायी ll एवढयावरच न थांबता, आंब्याच्या प्रकारांबाबत, ‘आंबे एकरंगी दुरंगी l पाहो जाता नाना रंगी ll’ असे लिहितात. संत एकनाथांनाही आंब्याने भुरळ पाडली असावी. आंब्याच्या गुणधर्म बदलाची सांगड घालत परमेश्वराशी एकरूप होण्याने काय साध्य होते, ते समजावताना ‘आंबेया पाडू लागला जाण l अंगी असे आंबटपण ll सेजे मुरल्याची गोडी l द्वैताविण ते चोखडी ll अग्नी-पोटी निपजे अन्न l वाफ जिरता परमान्न ll एका जनार्दनी गोडी l तोडा लिगाडाची बेडी ll’ असे सांगतात. आणखी एका अभंगामध्ये ‘आंबे केळी द्राक्ष-घडू l नामापुढे अवघे कडू ll नाम गोड नाम गोड l हरि म्हण्तां पुरे कोड ll’ हरिनामापुढे सर्व काही फिके असे लिहितात. ज्ञानेश्वर माऊलींच्या रचनांमध्येही आंबा भेटतो. रस्त्यावरील झाडाच्या ज्या फळाची जो अपेक्षा धरेल ते त्याचे असेल ‘वाटे पिकलिया रूखाचें l फळ अपेक्षीं तयांचे ll तेवीं साधारण कर्मांचें l फळ घे तया ll’ असे लिहितात. इतर ओव्यांतही ते आंब्याचा दाखला देतात.  

 ग.दि. माडगुळकर यांचे आशाताईंच्या आवाजातील ‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात’ हे बालगीत प्रत्येकाचे बालपणातील आवडते गीत. वसंत बापट यांच्या अनेक कवितात आंबा येतो. श्रीमंत-गरीबातील दरी दाखवणाऱ्या कुंपण कवितेत ‘आंबा खाउन फेकली मी, कुंपणाबाहेर कोय, त्याने म्हणले घेऊ का? मी म्हणले होय…’ असा उल्लेख येतो. तर कृष्णशास्त्री चिपळूणकर

‘ज्याचे पल्लव मंगलप्रद, शिणा छाया जयाची हरी,

गंधे युक्ते फुलें, फळेंही असती ज्याचीं सुधेच्या परी,

वाटे जो रमणीय भूषणवनश्रीचे मुखींचें,

भला आम्रा त्या पिक संवितां समसमां संयोग की जाहला!’

असे मनोहारी, आंब्याप्रमाणेच रसभरीत वर्णन करतात. आंब्याबाबत लिहिताना त्यांची लेखणी खुलते, लेखणीत बाभळीवरील कवितेत आलेला शुष्कपणा दिसत नाही. तर कवी मुरलीधर नारायण गुप्ते तथा कवी बी यांच्या चाफ्यावरील कवितेतही ‘गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनेसवे गाणी, आम्ही गळ्यात गळे मिळवूनी रे’.  

हिरवे तळकोकण या आपल्या कवितेत माधव काटदरे लिहितात, ‘पिकले आंबे गळुनि, भुतळी रस जोवरी वाहतो, वनदेविसह झिम्मा खेळत तोंवरि नृप राहतो’. तर कुसुमाग्रजांच्या गवताचं पातं कवितेत निळं निळं पाखरू आंब्यावर गात नाचायला चला, असे सांगते. ग.दि. माडगुळकरांच्या ‘देवाचे घर’ या कवितेत आंब्याच्या झाडाला सोन्याची कैरी लागते. तर मंगेश पाडगावकरांच्या ‘रडूबाई’ कवितेत ‘झाडावर आंबा पिकला तेव्हा मी तो विकला, विकून आला रूपया, मी घेतल्या पपया, पपया, पपया निघाल्या कडू आणि मला आले रडू’ या शब्दात आंबा भेटतो. आंबा या एका झाडावर ज्ञात अज्ञात कवींच्या शेकडो, हजारो नव्हे तर लाखात कविता भेटतील. कविवर्य इंद्रजित भालेराव यांच्या ‘उगवले नारायण’ या एका काव्यसंग्रहात आंबा तीन ठिकाणी, तीन रूपात भेटतो. ‘पड पड रे पावसा’ कवितेत आंब्याच्या झाडावर बसून कोकिळा कुहू बोलते. तर ‘गर्भिनी नार’ या कवितेत गरोदर स्त्रीच्या चालण्याचे वर्णन करताना आंब्याचे आणि चिंचेच्या आकड्यांचे झाडावरील डुलणे आठवते. तर ‘माऊलीची दुर्दशा’ या कवितेत आंब्याच्या झाडाला ओंजळीने पाणी घालून वाढवावे तसे आपल्या चिरंजीवाला वाढवते. तोच मुलगा सुनेपुढे लाचार होतो. तो आपल्या आस्तूरीच्या डोक्याचा भुगा करायला सांगतो, असे डोळे पाणावणारे काव्य लिहितानाही त्यांनी  आंबाच मदतीला घेतला आहे. आंब्याचे कौतुक करताना ते लिहितात, ‘पाडाचा आंबा पाहून मर्तिकामागं गवरणाऱ्याच्याही तोंडाला पाणी सुटतं, तिथं तुझीमाझी काय कथा, आंबा आहेच तसा, मर्तिकालाही जाग आणणारा’. आणखी एका कवितेत आंब्याने अंदाज बांधायला, मनाचे मानायला, धुम्म पळायला शिकवले हे सांगत असताना शेवटी लिहितात, ‘शेवटी खायचीच वस्तू आहे नेली असेल लेकरानं, शहाण्याना असं शहाणपण शिकवल’. आणखी एका कवितेत भालेराव सरांच्या स्वप्नात आमराया येतात. तर शहरीकरणाचा परिणाम झाडावर झाल्याचे ‘रानातला आंबा l अंगणात आला, संकोचून गेला l वर्दळीने’ असे सुंदर भाष्य करतात.

अमिर खुस्रोचे आम्रप्रेम त्याच्या काव्यातूनही कसे प्रतिबिंबित झाले याचेही वर्णन एका कवितेत आले आहे. ओंकार देशमुख यांची हापूस आंब्यावरील फेसबुक पेजवरील कविता आंब्याचे कौतुक करणारी आहे. ‘हापूस आंब्याची लज्जत न्यारी, एकदाच खाल्ला पण किमतीला भारी’ अशी सुरुवात करत लंगडा, दशहरा अशा विविध आंब्यांचे गुणदर्शन घडवते. गंगाधर मुटे यांच्या ‘रानमेवा’ या काव्यसंग्रहात ‘आंब्याच्या झाडाला वांगे लागत नाही’ या कवितेत मानवाने कसे असावे, याबाबत आंब्याच्या झाडाच्या गुणांना आधार घेत मांडले आहे. मराठी चित्रपटातही लावण्यामध्ये आंबा आला आहे. ‘पाडाला पिकलाय आंबा’ ही सुलोचना यांच्या आवाजातील लावणी सर्वांना परिचित आहे. वि.म. कुलकर्णी यांच्या ‘नदीचे गाणे’ या कवितेत आम्रतरू शीतल छाया देते. तर बा.भ. बोरकरांना ‘माझे घर’ या कवितेत घराजवळ ‘फुलपाखरांच्यासाठी पुढे फुलझाडे चार, आंबा एखादा कलमी यावी म्हणुनिया खार’ लावायचे आहे. आंब्यावरील कवितांचा उल्लेख करत गेले तरी एका ग्रंथाची निर्मिती व्हावी. इतर अनेक कथा कादंबऱ्यातही आंब्याच्या झाडाची रसभरीत वर्णने आलेली आहेत. अनेक नायक नायिकांना लपण्यासाठी आंब्याचा मोठा बुंधा उपयोगी आलेला आढळतो. ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटात बसंती कैऱ्या पाडतानाचा मजेदार प्रसंग आहे. मात्र आज आंब्याच्या झाडांची मोठ्या प्रमाणात होणारी तोड पाहिली की लपायला असे बुंधे मिळणार का? असा प्रश्न पडतो. पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ या वृक्षतोडीवर ‘आंबा फुलतो, मोहोर जळतो’ कोकणचा राजा तळमळतो’ असे रास्त वर्णन करतात. मात्र आंब्याच्या झाडांवर मनापासून प्रेम करणारे आणि त्याला जगवणारे काही शेतकरी आहेत.

आंब्याचे आणि वसंत ऋतूचे एक अनोखे नाते आहे. यामुळे तो अनेक काव्यात जसा आढळतो, तसा संगीतातही आंब्यांचे प्रतिबिंब आढळते. त्यामुळे वसंत ऋतुशी निगडित रागामध्ये, चैतीसारख्या उपशास्त्रीय रचनांमध्ये आंब्याचा वृक्ष म्हणून, फळांचा उल्लेख येतो. कोकीळ पक्ष्याचा हा प्रिय वृक्ष. अनेक शास्त्रीय चीजांमध्येही हे झाड आढळते. रागावर आधारित चित्रांमध्येही आंबा येतो. मेंदी, रांगोळी, कपड्यावरील भरतकाम, हळद-कुंकवासाठीची कोयरी यामध्येही आम्रफळ आणि वृक्षाचे प्रतिबिंब दिसते.

ll ४ ll

आंबा अनेक कवी, लेखकांच्या जसा मदतीला धावतो, तसाच एका शास्त्रज्ञाच्याही मदतीला आला आहे. हा संशोधक म्हणजे अल्बर्ट हॉवर्ड. त्यांना भारतात ‘भारतीय शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी उद्युक्त करायला आणि शिकवायला’ पाठवण्यात आले होते. अल्बर्ट हॉवर्ड भारतात आले. ते पाहणी करत फिरत असताना भारतातील सेंद्रिय शेतीच्या प्रेमात पडला. यासाठी त्यानी भरपूर प्रयोग केले. इंदौर संस्थानाने त्यांना त्यांच्या प्रयोगासाठी खास जमीन उपलब्ध करून दिली. पारंपरिक पद्धतीने खत निर्मिती करण्यास सुरुवात केली. या पद्धतीला त्यांनी शास्त्रीय परिमाण दिले. त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचे तंत्र जाहीर केले. सर्वत्र ते रासायनिक खते आणि किटकनाशकांचा वापर न करता शेती कशी करावी, हे सांगू लागले. जग त्यांना ‘सेंद्रीय शेतीचा जनक’ म्हणून ओळखू लागले. मात्र त्यांना ज्या कामासाठी पाठवले ते काम करत नाहीत, हे पाहून खत कंपन्यांचे मालक चिडले. त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची मागणी केली. तशी चर्चाही सुरू झाली. त्याचवेळी अल्बर्ट हॉवर्ड यांनी इंदौर संस्थानामध्ये लावलेल्या आणि सेंद्रिय पद्धतीने वाढवलेल्या आणि पिकवलेल्या आंब्याची भेट राणीला दिली. ती भेट राणीला खूप आवडली. राणीने हे आंबे कसे तयार केले, पिकवले, याची माहिती घेतली. त्या मधूर आंब्याच्या चवीने तृप्त झालेल्या इंग्लंडच्या राणीने त्यांना नोकरीवरून काढायचे तर दूर, उलट त्यांना ‘सर’ ही मानाची पदवी देऊन गौरविले.

आंबा म्हटले की आणखी एक अवलिया आठवतो. या अवलियाचे तर प्राथमिक शिक्षणही पूर्ण झालेले नाही. उत्तर प्रदेशातील लखनौ जिल्ह्यातील मलिहाबाद गावातील कलिमउल्लाह खान यांनी आपली ‘आम’ आदमी म्हणून ओळख निर्माण केली आहे. शाळेतील आपली प्रगती त्यांनाच पाहवत नव्हती. शेवटी सातवीतच त्यांनी शाळा सोडून दिली. वडिलांसोबत चौदा एकर आंब्याच्या बागेत काम करू लागले. बालपणीच त्यांनी आंब्याची कलमे बांधण्याची कला अवगत करून घेतली. १९५७ पासून त्यांनी एक मोठे आंब्याचे झाड निवडून त्यावर विविध वाणांची कलमे बांधायला सुरुवात केली. पहिल्या चार वर्षात त्या झाडावर २५० विविध प्रकारच्या वाणांची कलमे बांधली. आज या एकाच झाडावर ३१५ प्रकारचे आंबे लागतात. वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे डोळे बांधलेले असताना कोणत्याही वाणांचे फळ तोडून त्यांच्या हातात द्यावयाचे. ते त्याचा आकार, साल, वास यावरून आंब्याचे नाव सांगतात. त्याचबरोबर नवे वाण तयार करण्याचे तंत्रही त्यांनी अवगत केले. या पारंपरिक शिक्षण न घेतलेल्या अवलियाने अनेक जाती विकसित केल्या आहेत. सुरुवातीस ते त्या झाडाच्या फळाच्या गुणानुसार नाव देत. लज्जेने लाल झालेल्या गालांच्या रंगासारखे फळ देणारा ‘हुस्न-ई-आरा’, हृदयाच्या आकाराचा ‘अस्ल-उल-मुक्कदर’, कडवट चवीचा ‘करेला’, लांब फळ असणारा ‘केवलचंपा’, अतिशय सुंदर चवीचा ‘वालाजाह पसंद’ अशी नावे दिली. शरबती, बारग्रेन, पुखराज, खास-उल-खास, मख्खन, शामसुंदर, प्रिन्स, हिमसागर हे काही त्यांनी तयार केलेले वाण आहेत. त्यानंतर त्यांनी नव्या वाणांना कुटुंबातील सदस्यांची नावे दिली. सर्वांची नावे देऊन झाल्यानंतर त्यांनी सुप्रसिद्ध व्यक्तींची नावे द्यायला सुरूवात केली. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉय, सुनिल गावसकर, सोनिया गांधी, अखिलेश यादव ही करीम साहेबांच्या आंब्याच्या आणखी काही वाणांची नावे आहेत. या अवलियाच्या बागेत सर्व ऋतूत फळे देणारी झाडे आहेत. ‘आंब्याच्या झाडावर रसायने, औषधे फवारणे म्हणजे आपल्या बाळाला विष देण्याइतके मोठे पाप आहे’, असे ते सांगतात. त्यांच्या बागेत येणाऱ्यास कितीही आंबे मोफत खाता येतात. ते दरवर्षी हजारो रूपयांचे आंबे मोफत वाटतात. उत्तर प्रदेश सरकारने त्यांना ‘उद्यान पंडित’ पदवी प्रदान केली आहे. त्यांना आजवर आंब्याने ३०० पेक्षा जास्त पुरस्कार मिळवून दिले आहेत. अलिकडेच तयार केलेल्या वाणाला त्यांनी ‘नमो’ हे नाव दिले आहे. त्यांनी सात जुलै हा दिवस ‘जागतिक आंबा दिवस’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. अहमदाबादच्या श्रीकृष्ण मंदिरात आरास करण्यासाठी आंबे पाठवतात. त्यांच्या आंब्यावरील प्रेमामुळे आणि कार्यामुळे हिंदी भाषिक प्रांतात त्यांची ओळख ‘आम’ आदमी म्हणून झाली आहे.

असाच एक अवलिया महाराष्ट्रातही उदयास येत आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात अंतराळ गावात काकासाहेब सावंत शेती करतात. त्यांनी चांगली नोकरी सोडून शेती करायला सुरुवात केली. आंब्याची रोपवाटिका विकसित करून ते कलमी रोपे विकू लागले. केशर, हापूस, सिंधू, नीलम, सोनपरी, निरंजन अशा चव्वेचाळीस वाणांची रोपे विकत. रोपे न्यायला येणारे गिऱ्हाईक, रोपाला येणारे आंबे कसे असतील, हे विचारत असे. ते दाखवायचे तर शेतात सर्व वाणांची रोपे लावणे, आवश्यक होते. तसेच प्रत्येक वाणाच्या झाडाजवळ नेऊन गिऱ्हाईकाला सांगणे वेळ खाणारे होते. यावर उपाय म्हणून त्यांनी एकाच झाडावर सर्व कलमे बांधली. २०२१ मध्ये त्यातील बावीस कलमांनी फळे पकडली आहेत. वाशीम येथील शेतकरी रवी मारशीटवार यांनी आपल्या बागेत १३५१ विविध प्रकारचे आंब्याचे वाण लावले आहेत. त्यातील एक रायवळ आंब्याच्या एका झाडावर त्यांनी ५१ विविध प्रकारच्या आंब्यचे उत्पादन घेतले आहे. एकाच बुंध्यावर इतक्या वाणांची फळे लागणे हा महाराष्ट्रातील विक्रमच आहे.

मध्यप्रदेशातील जबलपूर शहरातील शेतकरी संकल्पसिंह परिहार यांची गोष्ट आणखी वेगळी आहे. ते आंब्यावर अतोनात प्रेम करतात. त्यांनी आपल्या शेतात एकूण चौदा प्रकारच्या आंब्याची झाडे लावली आहेत. त्यांनी आपल्या शेतात जपानमध्ये विकसित झालेला ‘टायगो नो टमेंगौश’ या आंब्याच्या वाणाची लागवड केली आहे. या वाणाच्या झाडाला यावर्षी सात आंबे लागले आहेत. हे आंबे पिकल्यावर त्यांना लाल – पिवळा रंग येतो. पूर्ण वाढलेल्या आंब्याचे वजन नऊशे ग्रॅमपर्यंत भरते. तो कापून खातात. अप्रतीम गोड चवीच्या या आंब्याच्या प्रत्येक फळाचे मूल्य दोन लाख सत्तर हजार रूपये आहे. त्यामुळे त्यांनी तीन रखवालदार आणि नऊ कुत्र्यांचे संरक्षण या फळांना दिले आहे. केवळ आंब्याच्या संरक्षणाची अशी सोय करणाऱ्या या घटनेची बातमी झाली नसती, तरच नवल.

ll ५ ll

     आंब्याच्या पानांचा भिरभिरा आणि कोया खेळणे हे लहानपणातील आमचे खेळ. कोया गोट्यांना उत्तम पर्याय होता. गोट्यांप्रमाणे रचना करून कोया खेळताना वेळ कसा जायचा, हे कळायचे नाही. एकत्र कुटुंब असताना शेतात एकूण तेरा आंब्याची झाडे लावली होती. वडील सर्वात मोठे. ते सातवीत असताना ही झाडे लावली होती, असे सांगितले जाते. पुढे १९७१-७२ मध्ये कुटुंब विभक्त झाले. शेती वाटण्यात आली. आंब्याची झाडे मात्र सामाईक ठेवली. एकाची चार कुटुंबे झाल्यानंतर सर्व कुटुंबातील मुलांना फळे चाखायला मिळावीत, हा त्यामागचा उद्देश. त्यामुळे तेरा झाडे आमच्या मालकीची होती. डिसेंबर महिन्यात आमची या झाडाकडे एक फेरी व्हायची. यावर्षी आंबे खायला मिळणार की नाही, याचा आम्ही अंदाज घ्यायचो. गावातील त्या भागात शेळ्या चारायला घेऊन जाणारे गावातील मित्र, विशेषत: तात्या मोहोर आला की हटकून सांगायचा, ‘अण्णा, केळ्या लयंच फुललाय!’ तात्याचे एवढे वाक्य आम्हाला भविष्यात घेऊन जायचे आणि आमच्या डोळ्यासमोर आम्ही केळ्या आंबे चोखून खात असल्याचे चित्र यायचे. मार्च-एप्रिल महिन्यात, वादळ-वारे सुटले की आम्ही पळत शेतात जायचो. पडलेल्या कैऱ्या गोळा करून आणायचो. त्या काळीही मोठ्या प्रमाणात कैऱ्या पडायच्या. त्यांचेही वाटे व्हायचे आणि चार घरात जायचे. पुण्याच्या चुलत्यांच्या शेतात एकही झाड नव्हते. आमच्या वाटणीला आलेल्या शेतात केवळ एकच झाड होते. आमच्या शेतात असणारे झाड उंच वाढलेले होते. चारी बाजूने असलेल्या झाडामुळे त्याला जगण्यासाठी उंच जावे लागले होते. त्याला फार कमी फळे यायची. हृदयाच्या आकाराचा आंबा कैरीरूपात असताना दात आंबवण्याच्या कामाचा असायचा. पिकल्यानंतरही त्याची गोडी काही खास नव्हती. मात्र फळाचे झाड तोडायचे नाही, हे वडिलांचे व्रत असल्यामुळे ते झाड निश्चिंत होते. तसेही ते झाड शेताच्या कडेला असल्याने काही त्रासही नव्हता. त्याचा विस्तारच फार नसल्याने फळही कमी लागायचे. त्यात पक्षी त्यावर तुटून पडत तरीही चार-पाचशे फळ निघायचे. हे झाड फार वर्षे जगले नाही.

दोन नंबरच्या चुलत्यांच्या शेतात चार झाडे होती. त्यांना आम्ही बाबा म्हणायचो. या चार झाडातील एका झाडाला कधीच फळ आले नाही. दुसऱ्या झाडाला ग्रामदेवता निळकंठेश्वराला अर्पण करण्यासाठी एक किंवा दोन फळे आली. त्यांच्या पासुडी नावाच्या एकाच शेतात चारही झाडे होती. त्यातील एका झाडाला भरपूर आंबे यायचे. त्याला विशिष्ट शेपूसारखा वास असायचा. त्याचे बारसे कधी आणि कोणी केले होते माहित नाही; पण, त्याला आम्ही ‘शेप्या’ म्हणायचो. एक वर्षाआड भरपूर फळे यायची. जिरायत रानात असल्याने त्यांचा विस्तार फार झाला नव्हता. एकदा या झाडाचे चारशे आंबे वाटून आले होते. कातडी जाड असल्याने त्याला पिकायला जास्त दिवस लागत. मात्र पिकल्यानंतर चवीला एकदम भारी. मध्यम आकाराच्या आंब्याचा रस घट्ट आणि गोड होता. दुसऱ्या आंब्याच्या झाडाचा आकारच लहान होता. फळही लहान होते. त्याला तसे काही नाव दिले नव्हते. त्याची चवही लक्षात ठेवण्यासारखी नव्हती.

सर्वात धाकट्या चुलत्यांच्या शेतात आठ झाडे होती. सर्वात धाकट्या चुलत्यांना आम्ही बापू म्हणायचो. इतर आठ झाडे त्यांच्या शेतात होती. त्यातील ‘मनमोहन्या’ उर्फ आमट्या हे झाड कारवाट नावाच्या शेतात होते. हे मोठे झाड होते. त्याचे फळही मोठे. मात्र जगातील सारा आंबटपणा याच्या फळात काठोकाठ भरलेला होता. या झाडाचे पिकलेले फळ खूप आकर्षक दिसायचे. कधी हातात घेऊन ते खाईन, असे व्हायचे म्हणून ‘मनमोहन्या’. मात्र फळ खाल्ले की आंबटपणामुळे थुंकून टाकावा लागत असे. इतका आंबट. त्यामुळे त्याचे दुसरे नाव आमट्या. या झाडाची पिकलेली फळे कितीही नावडती असली, तरी याच्या फळांचा उपयोग लोणच्यासाठी होत असे. या फळांना लोणच्यासाठी मोठी मागणी असे. 

याच चुलत्यांच्या तुंब नावाच्या शेतात उरलेली झाडे होती. त्यातील दोन झाडे फळे येण्यापूर्वीच वाळून गेली. शेतात जाताना झाडातील ‘सुगड्या’ हे सर्वात पहिले झाड. याला येणारे फळ खूप मोठे असल्याने त्याचे नाव सुगड्या. याला भरपूर फळे लागत. मात्र फळांच्या वजनामुळे निम्म्यापेक्षा जास्त फळे वाऱ्याने गळून जात. त्याचा विस्तार कमी, त्यात ही गळ. त्यामुळे दोन अडिचशे फळेच हाताशी लागत. मात्र या फळांची आम्ही आवर्जून वाट बघायचो. एक आंबा खाल्ला तरी पोट भरत असे.  त्याच्याजवळच गोटी आणि नरसूची गोटी ही दोन झाडे एकाच आळ्यात होती. त्यातील नरसूची गोटी हे नाव कसे आले, माहित नाही. मात्र याला फळ लागले की द्राक्ष्याचे घड लोंबकळत असल्यासारखे दिसायचे. एकाच घोसात तीस-तीस फळे असायची. अत्यंत लहान गजग्याच्या आकाराची ही फळे. त्यात या झाडाच्या फळांची चव फार आकर्षक नव्हती. त्यामुळे त्याला फळे येणे किंवा न् येणे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे नसायचे. उलट ते आंबे खायला आम्ही नाखूश असायचो. त्याच्याच आळ्यात वाढलेल्या गोटीला क्वचित फळे यायची. ही फळे नरसूच्या गोटीपेक्षा थोडी मोठी होती. मात्र त्याचीही फळे फार लक्षात ठेवावीत, अशी नव्हती. मुळात त्यांची चव क्वचितच चाखायला मिळायची.

आमच्या प्रेमाची आणि आठवणीतील खरी दोन झाडे. केळ्या नावाचे झाड आमच्या खास आवडीचे. त्याचे फळ फार गोड होते म्हणून नाही. तर त्याला दरवर्षी कमी-जास्त प्रमाणात फळे यायची. याचा बुंधा आम्ही सर्व भावंडे एकत्र आलो तरी आमच्या कवेत यायचा नाही. हे झाड खूप उंचही होते. याच्या फळांचा आकार केळीसारखा लांब होता. कोयही त्याच आकाराची. कातडी पातळ. याला कैऱ्या लागल्या की पोपट या झाडावर अड्डा जमवायचे. भरपूर फळे खात असायचे. झाडाचा आकार खूप मोठा असल्याने फळांची संख्या खूप असायची. या झाडाखाली अर्धवट खाल्लेले पिवळेधम्मक आंबे सापडले की आमची नजर वर फिरायची. कोठेतरी पानाआड पिवळा आंबा दिसत असे. मग त्या फांद्या लक्षात ठेऊन घरी वडिलांना वार्ता दिली जायची. सुट्टी पाहून आंबे उतरण्याचा दिवस ठरत असे. या झाडाचे आंबे उतरण्याचे काम तीन-चार दिवस चालत असे.

सर्व झाडातील ‘साखरगोटी’ नावाचे झाड सर्वात जास्त आवडायचे. अट्टूच्या गोटीच्या आकारापासून लहान चेंडूच्या आकाराचे फळ या झाडाला यायचे. याला एक वर्षाआड भरपूर फळे येत. कैऱ्या खाण्यात आम्हाला रस नसायचा. याला कधी पाड लागतो आणि गोटीचे आंबे खायला मिळतात, असे व्हायचे. याचा पाड लागलेले कळायचेही नाही. पिकल्यानंतर आंब्याला थोडासा पिवळसर रंग दिसायचा. मात्र पिकला हे लक्षात येण्याइतका नसे. त्यामुळे सुरुवातीची पिकणारे आंबे खारूताईने खाऊन रंगीत कोया खाली टाकल्या की आम्हाला पाड लागलेले कळायचे. अजूनही कळत नाही कोणता आंबा पिकत आहे, पक्व झाला आहे, हे या खारूताईला कसे कळते? याचा विस्तार मोठा, मात्र उंची कमी होती. या झाडावर पक्षी कमी असायचे. साखरगोटीचे आंबे उतरले की आम्ही गुपचूप पिकलेत का, हे चाचपून पाहायचो. वडिलांच्या लक्षात आले की आंब्याऐवजी बोलणी खावी लागायची. पुन्हा त्या खोलीत प्रवेश बंद व्हायचा. आंबे पिकले की आम्ही एकदोन आंबे खिशात घालून बाहेर पळायचो आणि खायचो. ज्या वर्षी फळं कमी यायचे त्या वर्षी मात्र असे आंबे पळवता येत नसत. या आंब्याचा आकार लहान, तशी त्याची कोयही लहान होती.

आंबे उतरायच्या दिवशी आम्ही सर्व सख्खी चुलत भावंडे शेतात असायचो. शेतात गेल्याबरोबर प्रथम आम्हाला उतरलेले आंबे ओतून ठेवायला जागा साफ करायचो. दिवसभर सावली राहील अशी जागा निवडली जाई. गांजात पुरेसे आंबे जमा होईपर्यंत आंब्याची वाळलेली पसरट पाने शोधायचो. काही महिन्यांपूर्वी निघालेल्या ज्वारीच्या कांड्या सहज कोठेतरी मिळायच्या. शेळीच्या लेंढ्या तर रानभर असायच्या. पानाला आम्ही व्यवस्थित कापून त्याला दोन पाती बनवायचो. यासाठी मधला भाग निवडायचा कारण त्या भागात दोन बाजू समान राहतील असा भाग मिळे. बाभळीचा काटा, ज्वारीच्या धाटाची एक कांडी आणि शेळीची एक लेंढी, एवढे साहित्य आमचा भिरभिरा किंवा पंखा बनवायला पुरेसे असे. तो फिरू लागला की अत्यानंद होत असे. कोणी पाहो, अथवा न पाहो, आम्ही एकटक त्या फिरणाऱ्या भिरभिऱ्याकडे बघत बसायचो. नवनिर्मितीचा – सर्जनाचा निखळ आनंद खऱ्या अर्थाने तो होता, हे आज जाणवते. अर्थात तासाभरात लेंढी निखळणे, पान फाटणे व्हायचे आणि आमची पुन्हा भिरभिरा बनवायची धडपड सुरू व्हायची.

उतारी गांजात शे-दोनशे आंबे जमा झाले, की त्याची दोरी सोडून गांजा खाली सोडत असे. आमचे काम गांज्यातील आंबे खाली साफ केलेल्या जागेवर ओतून घ्यायचे आणि गांजा वर पाठवण्याचे असे. गांजातील आंबे ओतले, की आम्ही त्यात पाड शोधत बसायचो. असे आंब्यात पाड शोधणे, वडिलांना आवडत नसे. उतारी मात्र चांगले पाडाचे आंबे वरच खिशात आपल्या मुलांसाठी काढून ठेवत. आम्हाला खूप राग यायचा. आम्ही वडिलांकडे तक्रार करायचो, झाड आपले, आपण त्यांना उतारा देतो. मग त्यांनी असे पाड काढून ठेवावेत का?’ यावर वडिलांचे उत्तर ठरलेले असायचे, ‘अरे, तळे राखील तो पाणी चाखील. अण्णा झाडावर चढलेत. तुम्ही चढा आणि घ्या काढून पाड.’ आम्ही झाडावर चढू शकत नसायचो आणि चांगले पाड काही मिळत नसत. गावातील बब्रुवाहन अण्णा हे काम करायचे. त्यांचा मुलगा तात्या पुढे आंबे उतरायचे काम करू लागला. अण्णांचा भाऊ निळू आबाही सुरुवातीला मदत करायचे. दुपार झाली की उतारी खाली येत असे. मग आंब्याच्या झाडाखालीच पंगत बसायची. अण्णा भरपूर पाड मिळाले असले तर सर्वांना द्यायचे. नाहीतर कच्चा आंबा कापून भोजन उरकले जाई. पुन्हा उतारी झाडावर चढत असे. आमच्या डोळ्यावर पेंग येत असे. मग जी फांदी उतरली जात असे ती सोडून एका बाजूला आम्ही बरोबर नेलेला टॉवेल अंथरून झोपी जायचो. मात्र गांजा भरला की उतारी हाक मारायचे आणि आम्हाला उठावे लागायचे.

केळी, साखरगोटी या झाडांना पाच सहा हजार फळ यायचे. त्या काळात आंबे उतरण्याच्या बदल्यात मजूरी म्हणून आंबेच मिळायचे. एक फड म्हणजे सहा आंबे. शंभर फडी आंबे उतरले की सहा फडी उतारा मिळत असे. आंबे उतरून झाले की संध्याकाळी वाटण्या होत असत. आंबे वाटताना फडी मोजण्याची सुरुवात एक असे न म्हणता ‘लाभ’ असे म्हणून केली जात असे. तर आठ न म्हणता तेथे ‘अधिक’ असे म्हणत. हे कोणते पाढे असा प्रश्न बालमनाला पडत असे. ‘लाभ म्हणजे फळ लाभले म्हणून आणि आठ म्हणत नसत कारण रास लवकर संपू नये म्हणजेच ‘आटू नये’ म्हणून’ असे न पटणारे उत्तर मिळाले. आंबे वाटून झाले की सर्वजण आपल्या वाटणीचे आंबे घेऊन घरी येत असू. जोपर्यंत बापूंची गाडी होती, तोपर्यंत बैलगाडीतून प्रत्येकाच्या वाटणीचे आंबे सुखरूप घरी येत. बाबा सायकलवरून न्यायचे. एक-दोनवेळा मीही मोटारसायकलवरून आंबे घरी आणले होते.

उतरलेल्या आंब्यासाठी घरात गवताची गादी करून ठेवलेली असायची. त्यावर आंब्यांना व्यवस्थित पसरून ठेवले जाई. त्यांना पुन्हा वरून गवताचे पांघरूण घातले जायचे. सातआठ दिवसांची विश्रांती झाली की त्यांच्या पिकण्याची बातमी आमच्यापर्यंत वासातून पोहोचायची. आंब्याची अढी घातलेल्या खोलीत आंबे भरपूर आलेल्या वर्षी प्रथम ते पाट्यांमध्ये भरून सर्व नातेवाईकांच्या गावी पोहोच केले जात. घरात नुसता घमघमाट सुटलेला असे. घरात आमरसाचा बेत वारंवार होत असे. थोडे मोठे झाल्यावर रस करण्याची जबाबदारी आमच्यावर आली. आंबे प्रथम स्वच्छ धुतले जात. त्यानंतर ते बिलबिलीत करून त्याचे देठाकडील टोपण किंवा बुड काढून थोडा रस बाहेर टाकला जात असे. त्यातून बाधणारा चिक बाहेर पडत असे. चपाती, पोळी आणि धिरडे यापैकी काहीतरी जोडीला असायचे. सुट्टीत आम्ही सख्खी चुलत साताठ भावंडे, भाचरे घरात असत. त्यामुळे मोठ्या पातेल्यात रस बनवावा लागे. कोण जास्त रस पितो याची बालगोपाळात कधीकधी शर्यतही लावली जात असे. सकाळी नाष्ट्याबरोबर पिकलेल्या आंब्याची पाटी ओसरीत आणून ठेवली जात असे आणि आम्हाला ती संपवण्याचे आव्हान दिले जायचे. साखरगोटी आणि केळ्याच्या फळांनी भरलेली पाटी लगेच‍ रिकामी होत असे.

आंबा कसा खायचा, हे लहान मुलांना कोणाला तरी शिकवावे लागे. अगदी लहान भावंडांना आंबा चोखून खाण्यासाठी तयार करून द्यावा लागे. आंबा बिलबिलित करून त्याचे देठ काढायचा आणि थोडा चीक जाऊ दिल्यानंतर, तो खायला घ्यायचा. काढलेल्या देठाच्या भागाच्या ठिकाणातून रस बाहेर येत असे. तो चोखून प्यायचा. रस संपत आला की कोय बाहेर काढून कोय चोखायची. कोय पांढरीफेक होईपर्यंत तिचा रस शोषला जात असे. त्यानंतर सालीचा क्रमांक लागे. सालीची घडी घालून दोन-तीन वेळा दाताने रस चोखला जात असे. त्यानंतर दुसऱ्या टोकाला सालीचा तुकडा काढला जाई. त्या भागाकडून रस दाताने दाब देत पिला जाई. सालीला किंवा कोयीला कोण रस तसाच ठेवतो का? यावरही देखरेख असे. कोणी अर्धवट खाऊन नवा आंबा घेतला की, ‘नीट खा की रे, माणसानं खाऊन माजावं, टाकून माजू नये’ ही म्हण ऐकावी लागत असे. त्यानंतर कोया वेगळ्या आणि साली वेगळ्या पाटीत जात असत. साली जनावरांच्या आमोण्यात जात असत. तर कोया उकिरड्यावर जात. उन्हाळ्यात उकिरड्यावर पडलेल्या कोयांवर पावसाचे तुषार पडताच त्या कोयीतून तांबडे, चॉकलेटी, गुलाबी, लाल कोंब बाहेर येत. त्यातील काही रोपे उपटून शेतात लावायला नेली जात. मात्र आमचा आणखी एक खेळ चालत असे. अशा नुकत्याच कोंब आलेल्या मोठ्या कोया आम्ही शोधत असू. त्यावरील कठिण आवरण हलकेच दूर करायचो. त्यानंतर बीच्या द्विदल भागाला दुसऱ्या टोकाकडे आम्ही घासायचो. त्यानंतर दोन दलामध्ये अंतर असणारा भाग दिसायचा. तो विशिष्ट आकारात आला की आमची आम्रसनई तयार होत असे. त्यातून सनई, पिपाणीसारखे आवाज येत असत. हा खेळ मात्र चोरून करावा लागत असे. वडिलांनी पाहिले की रट्टे मिळायचे. ‘नव्या झाडाला वाढण्या अगोदर मारले’, म्हणून हा प्रसाद असायचा.  

          आंबे उतरून घरात आणल्यानंतर आणखी एक कार्यक्रम असायचा. आई त्यादिवशी निवडक आंबे बाजूला काढत असे. ते सर्व आंबे बादलीत भरून त्यावर पाणी ओतून ठेवत असे. आई अगोदरच हळकुंडे फोडून, दळून त्याची बारीक पावडर करून ठेवत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी जाड पात्याची आंबे फोडण्याची विळी काढली जात असे. ती स्वच्छ घासून, धुवून स्वच्छ केली जात असे. त्यानंतर स्वच्छ धुतलेले पांढरे कापड खाली अंथरून त्यावर विळी ठेऊन आंबे फोडण्याचा कार्यक्रम सुरू होत असे. आंबे फोडताना काळजीपूर्वक दाब दिला जात असे. थोडा निष्काळजीपणा दाखवला तर बोटाचा तुकडा पडण्याची भिती असायची. त्यामुळे हे काम फार कौशल्याने केले जात असे. आमच्याकडे त्यातील बियांचे तुकडे बाजूला काढून टाकायचे काम असे. त्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ आणि लसूण यांचे योग्य प्रमाणात केलेले मिश्रण भरले जात असे. असे मिश्रण भरलेल्या सर्व फोडी अगोदरच स्वच्छ धुवून ठेवलेल्या मडक्यात फोडी भरल्या जात. त्यावर स्वच्छ धुतलेले कापड झाकून बांधून ठेवले जात असे. सात ते आठ दिवसात त्याला पाणी सुटून मुरत असे. लोणचे मुरले की त्यातील फोडी काढून भाकरीवर घेतल्या जात असत. ‘खार - भाकर खाणे’ हा त्यावेळी आनंदाचा भाग असे. कोयीवरील मांसल भाग संपल्यानंतर वाटीतील पाणी घेऊन कितीतरी वेळ कोय चोखत बसायचो. ते आनंदाचे क्षण आजच्या मुलांना कोणतीही लोणचे विकणारी कंपनी देऊ शकत नाही.      

आमच्या मालकीच्या आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या आंबट असल्याने फार ओढ नसायची. मात्र गावातील निलकंठेश्वर मंदिराच्या बाजूला एक झाड होते. त्या झाडाच्या कैऱ्या मीठ न लावताही खायला आवडायच्या. खूप कैऱ्या खायचो. झाडाच्या फांद्या इतक्या खाली होत्या की बांधावरच्या फांद्याची फळे लहान मुलांच्या हाताला यायची. या झाडाला दगड मारायचे धाडस कोणी करायचे नाही. या आंब्याच्या झाडाचा आकार फार मोठा होता. या झाडाला अनेक आग्या मोहोळ बसलेले असायचे. दगड फांदीला लागला तरी त्या उठायच्या. या झाडाच्या कैऱ्यांची चव आजही आठवते. मात्र आमचे माध्यमिक शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच गावातील अनेक आंब्याच्या झाडांची कत्तल झाली. पांगरीत लाकूड कापणीचे यंत्र आणून बसवले गेले आणि पांगरी पंचक्रोशीतील आमराया संपल्या. गावाच्या बाहेर पडले की पूर्वी प्रत्येकाच्या बांधावर आंब्याची झाडे असायची. आता नुसते ओसाड वावर पाहून मनात आठवणींचे काहूर उठते. अनेक वर्षे झाली, आंब्याच्या मौसमात गावी जाणे झाले नाही. मात्र नोकरी निमित्त नांदेडला असताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये कुलगुरु सुर्यवंशी सरांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे लावलेली होती. या झाडांची बाग दुर्लक्षित होती. मी कुलसचिव असताना या बागांकडे विशेष लक्ष देण्याचे भाग्य मला लाभले. त्या बागा फुलवल्या आणि वर्षातच त्यांना चांगली फळे लागली. या फळांची विक्री करून लाखाचे उत्पन्न विद्यापीठास मिळाले. हे सारे आम्रप्रेमातून घडले. या झाडांमध्ये मला दशहरा वाणाची ओळख झाली. दशहरा लांब, निमुळता, पिकल्यानंतर तो हळदीसारखा पिवळा धमक होतो. याचा रस पातळ असतो, मात्र याची चव अवर्णणीय. पण या फळाला हापूससारखे भाग्य लाभत नाही. तो मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर भारतात मिळतो. महाराष्ट्रातील इतर भागात नाही. कदाचित पिकल्यानंतर तो लवकर पुढे जात असल्यामुळे असेल.

पूर्वी म्हणे लग्न आठ - दहा दिवस चालायचे आणि लग्नामध्ये आमरसाचे भोजन घातले जायचे, असे जुने लोक आमच्या लहानपणी सांगायचे. पाण्याच्या हाळामध्ये रस केला जात असे. आता असे लग्न दंतकथा वाटते. मात्र असे सोहळे अनुभवलेले अजूनही काही बुजुर्ग भेटतात. आज असे लग्न करणे कठीण आहे. असे लग्न करायचे झाल्यास मुळात एवढे आंबे मिळण्यासाठी आम्ही अशी जुनी भरपूर फळे देणारी झाडे जतन कुठे केली आहेत? आता शहरात आम्ही डझनावर, किलोवर आंबे आणतो आणि खातो.

आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कोयीपासून लावलेले आंब्याचे झाड त्याच प्रकारची फळे देत नाही कारण आंब्याच्या स्त्री-बीजाचे फलन होताना वेगळ्या प्रजातीच्या आंब्याचे परागकण त्यावर पडलेले असतात. या मधूर फळांची चव चाखताना आंब्याच्या या गुणालाही मानवाने मनोमन स्विकारले तर….? 

(उत्तरार्ध..)


लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी पुढील लिंकवर भेट द्या

http://drvnshinde.blogspot.com/2021/07/blog-post.html





२ टिप्पण्या:

  1. सर ,आंब्याविषयी खूप सखोल माहिती मिळाली .आंब्याच्या विविध प्रकाराविषयी तसेच लेखक, कवी यांनी आंब्याचा संदर्भ घेऊन मांडणी कशी केली ?त्याची माहिती मिळाली .धन्यवाद सर

    उत्तर द्याहटवा